न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरातील ५०० चौरस फुट आकारांच्या घरांना मिळकतकर माफ करावा. तसेच, अनधिकृत घरांना सरसकट शास्तीकर माफ करण्याचा सर्वसाधारण सभेने केलेला ठराव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी (दि. १२) सांगितले. तो ठराव मंजुर करायचा की विखंडीत हा निर्णय राज्य शासनावर अंवलबून आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर व शहरातील ५०० चौरस फुट आकारांच्या घरांना १०० टक्के मिळकतकर माफ करण्यात यावा. तसेच, एक हजार फुटांपेक्षा अधिक आकारांच्या अनधिकृत बांधकाम केलेल्या घरांना सरसकट शास्तीकर माफ करावा. त्यांची अंमलबजाणी १ एप्रिल २०२० पासून केली जावी, असा ठराव सत्ताधारी भाजपने १० जानेवारीच्या पालिका सर्वसाधारण सभेत मंजुर केला आहे.
आयुक्त म्हणाले की, मिळकतकर माफ केल्याने पालिकेस दरवर्षी ३७ कोटींचा तोटा होणार आहे. ते बुडणारे उत्पन्न कोठून भरून काढणार याची माहिती शासनाला दिली आहे. शास्तीकर १ हजार चौरस फुट आकारांच्या घरांना माफ करण्याचा अध्यादेश शासनाने काढला होता. त्यानुसार अध्यादेश प्राप्त झाल्यास पालिका त्यानुसार कार्यवाही करेल. अन्यथा पालिका पूर्वीप्रमाणे मिळकतकर आणि शास्तीकर वसुली या मोहिम कायम ठेवणार आहे.