न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचा कार्यकाळ दोन वर्षावरून एक वर्षाचा करून अधिकाधिक नगरसेवकांना संधी देण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून केला जात आहे. गेल्या वर्षी बंद केलेली ही पद्धत पुन्हा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे.
महापालिका नियमानुसार स्थायी समिती सदस्याचा कार्यकाळ २ वर्षांचा आहे. हे पद सर्वाधिक लाभाचे असल्याने अनेक नगरसेवक या पदासाठी इच्छुक ही असतात. या पदाचा लाभ अधिकाधिक नगरसेवकांना मिळावा म्हणून सत्ताधारी भाजपने सदस्यपदाचा दोन वर्षांचा कालावधी कमी करून तो एक वर्ष केला. त्याची व अंमलबजावणी फेब्रुवारी २०१८ ला झाली. मात्र, त्यानंतर फेब्रुवारी २०१९ ला त्या पद्धतीचा अवलंब सत्ताधाऱ्यांनी केला नाही. त्यामुळे भाजपच्या सदस्यांना २ वर्षांचा कालावधी मिळाला. मात्र, यंदा पुन्हा सदस्याचा कार्यकाळ एक वर्षांचा करण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे उर्वरित दोन वर्षांच्या कालावधीत १२ ऐवजी तब्बल २२ नगरसेवकांना समिती सदस्यपदी संधी मिळू शकते.
स्थायी समितीच्या सदस्यपदाचा कालावधी संपल्याने भाजपाचे विलास मडिगेरी, राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, ममता गायकवाड, करूणा चिंचवडे, नम्रता लोंढे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवड गुरूवारी (दि. २०) होणाऱ्या पालिका सभेत केली जाणार आहे. जर, भाजपने वर्षभराचा कालावधी केल्यास पक्षाचे उर्वरित ४ व अपक्ष १ असे ५ सदस्य बाहेर पडू शकतात. त्यामुळे भाजपचे १० व अपक्ष १ असे एकूण ११ जण समितीतून बाहेर पडतील.