न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना कोंडल्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून बुधवारी (दि. १२) कामकाज केले. याबाबत तसेच विशिष्ट निविदा प्रक्रियेवरून भाजपच्या दोन नगरसेविकांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दमदाटी करीत धारेवर धरले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी आयुक्तांच्या दालनात घडला.
अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना नगरसेविकेने कोंडल्याचा प्रकार नुकताच घडला. या निषेधार्थ पालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून बुधवारी काम केले. या प्रकाराची पालिकेत चर्चा होती. या मुद्यावरून सत्ताधारी भाजपाच्या दोन नगरसेविकांनी आयुक्तांची बुधवारी सायंकाळी भेट घेतली. पाण्यावरून आंदोलन केले असता अधिकारी काळ्या फिती कशा काय लावतात. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेचा निषेध करण्याची हिंमत कशी झाली. अधिकाऱ्यांवर तुमचा वचक नाही, त्यामुळे असे प्रकार घडतात, असे म्हणत त्यांनी आयुक्तांना दमदाटी केली. तसेच, विशिष्ट निविदेवरूनही वाद घातला. हा वाद एकेरी शब्दापर्यंत पोहचल्याचे सुत्रांनी सांगितले. आयुक्तांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ऐकण्याचा मनःस्थितीत नव्हत्या.
नगरसेविका विविध प्रश्नांसंदर्भात मला भेटण्यास आल्या होता. विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. यावेळी वाद झाल्याचा त्यांनी इन्कार केला.