न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- गुन्हेगारांच्या संपर्कात आलेल्या अल्पवयीन मुलांचे वेळीच समुपदेशन करून त्यांना सकारात्मक मार्ग दाखवा. मुलांना योग्य दिशा देण्यासाठी पथकातील पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे, अशी सूचना पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली. आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये नुकतेच विशेष बाल – पोलिस पथकाची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. १२) ऑटो क्लस्टर येथे या पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, विशेष बाल पथकातील सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल री सायन्सचे प्रकल्प अधिकारी जैद सय्यद, सामाजिक कार्यकर्ते विजय बावीस्कर, ॲड. मोरे आदींनी यावेळी मार्गदर्शन केले.
आयुक्त बिष्णोई म्हणाले की, या पथकात काम करत असताना एखाद्या बालकास देखील गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करून त्याला सकारात्मक ऊर्जा देता आली तर ती आपल्या जीवनातील सर्वात मोठी उपलब्धी असेल. नजरचुकीने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संपर्कात आलेली व व्यसनाधीनतेकडे वळालेल्या बालकांना या पथकाने समुपदेशन केले पाहिजे.
प्रास्ताविक सहाय्यक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पोलिस निरीक्षक सुधाकर काटे यांनी केले. सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव यांनी आभार मानले.
पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या संकल्पनेतून आयुक्तालयात कम्युनिटी पोलिसिंग सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रत्येक पालिस ठाण्यात विशेष बाल पोलिस पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकामध्ये एक पोलिस अधिकारी आणि किमान तीन पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व पथकांचे नियंत्रण प्रमुखपदी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.