न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२०) :- खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२० रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष आण्णासाहेब जाधव यांना खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आणि श्रीरंग आप्पा बारणे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सेवाभावी व्यक्तिमत्वांचा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने यथोचित सत्कार केला जातो. पिंपरी-चिंचवडसारख्या कामगारनगरीमध्ये सर्वसामान्य कामगार वर्गाच्या मुलांना मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे आणि ही मुले उच्चपदस्थ अधिकारी व्हावेत या उदात्त हेतूने विकास शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना करून दर्जेदार विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य संस्थापक, अध्यक्ष आण्णासाहेब जाधव अविरतपणे करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सदर कार्यक्रमात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास शिवसेनेचे उपनेते मा. रविंद्रजी मिर्लेकर, अध्यक्ष मा. गजानन चिंचवडे, उपाध्यक्ष मा. बशीर सुतार, कार्याध्यक्ष मा. धनाजी बारणे, सचिव मा. रवी नामदे, शिवसेना संपर्कनेते बाळाभाई कदम, शिक्षणतज्ञ प्रा. डॉ. अ. ल. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध सामाजिक क्षेत्रांत सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात आण्णांच्या कार्याविषयी बोलताना गजानन चिंचवडे यांनी या पुरस्कारास पात्र असलेल्या व्यक्तींचे कार्य अतिशय महान असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या पुरस्काराने सत्कारमूर्तींना एक नवी प्रेरणा मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी अशा प्रकारची सेवा करणाऱ्यांचे काम हे अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले. सन्मानाने माणूस मोठा होत नसून तर सेवाभावी व्यक्तीस काम करण्याची नवी प्रेरणा मिळते असेही ते म्हणाले. हा सत्कार सत्कार्मूर्तींनी केलेल्या कामाचा आणि भविष्यात करणार असलेल्या कामाचा सत्कार आहे अशा शब्दांत त्यांनी सत्कारमूर्तींचा गौरव केला. रविंद्र मिर्लेकर यांनी आपल्या मनोगतात सर्व सत्कारमूर्तींना भावी कारकिर्दीकरीता शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती व पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक अमित बच्छाव, विजय जाधव यांनी आण्णांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मनापासून अभिनंदन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, प्रतिभा देशपांडे, प्र. उपमुख्याध्यापक किसन आहिरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव यांनीही आण्णांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.















