न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२०) :- शहरातील अवैध प्रवासी वाहतूक व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून धोकादायक वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर पोलिसांनी कारवाई केली. शहरातील प्रमुख चौक, महामार्ग आणि कंपन्यांच्या परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वाहतूक पोलिस शाखेकडून १ ते २० फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहिम राबवून कारवाई करण्यात आली.
या माध्यमातून जवळपास ४ हजार ८७४ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून साडे अकरा लाखांचा दंड वसूल करण्यात आला. शहरात अवैध रिक्षांच्या थांब्यामुळे चौका-चौकात बकालपणा वाढला आहे. त्याचप्रमाणे या रिक्षा शहरात कोठीही थांबत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. वाहतूक पोलिसांकडे याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
रिक्षाचालकांप्रमाणेच इतर अवैध वाहनांमधूनही धोकादायक प्रवासी वाहतूक करण्यात येते. क्षमतेपेक्षा १६ जास्त प्रवासी बसवल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने १ ते २० फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहिम राबविली. पोलिसांनी ४ हजार ८७४ रिक्षांवर कारवाई करुन ११ लाख ६७ हजार दंड वसूल केला. रिक्षांबरोबरच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १६५ वाहनांवर पोलिसांनी खटले दाखल केले आहेत. त्यांच्यावर न्यायालय कारवाई करेल अशी माहिती वाहतूक विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त निलीमा जाधव यांनी दिली.












