न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२०) :- रिक्षाचालकांच्या प्रश्नांमध्ये वाढ होत आहे. त्यामध्ये शासकीय पातळीवर सुधारणा करणे गरजेचे से होते. मात्र, त्याबाबत प्रशासनच उदासीन असल्याचे चित्र आहे. रिक्षा चालकांची वाढती जीवघेणी स्पर्धा रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.
प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले की, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत सातत्याने रिक्षा संघटना पाठपुरावा करत आहेत. त्या बाबत केवळ आश्वासनच दिले जात आहे. मंडळ बनविण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. अनेकांनी रिक्षासाठी कर्ज काढले. त्यांना दिवसभर रिक्षा चालवावी लागत आहे. त्यांच्यावर असणारे कर्ज माफ करावे. शहरात सर्व स्तरातील लोकांसाठी घरकुल योजना आखल्या जात आहेत रिक्षा चालकांसाठी घरकुल योजना राबविण्यात यावी.
महाराष्ट्र सरकारने मुक्त रिक्षा परवाना सुरू केला असून मागेल त्यास परमिट असे सरकारचे धोरण आहे. यामुळे लोकसंख्येपेक्षा अधिक रिक्षा रस्त्यावर आल्या आहेत. रिक्षा चालकांमध्ये जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्वरित हे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. ओला, उबेरसह बेकायदेशीर वाहतूक बंद करावी या सह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा – पंचायतीच्या वतीने २६ फेब्रुवारी रोजी मुंबई आझाद मैदान येथे मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली.












