- महापौरांच्या आडून आमदार जगताप काढतात विधानसभा निवडणुकीचा वचपा – राहुल कलाटे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- शिवसेनेचा गटनेता असूनही मला सभागृहात बोलण्यापासून अडवले जाते. प्रत्येक वेळी सभागृहात माझ्यावर अन्याय केला जातोय. महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत विषयपत्रिकेवरील करवाढ प्रस्तावबाबतच्या चर्चेत मी सहभाग घेतला. मात्र महापौर ढोरे यांनी मला बोलण्याची संधी दिली नाही. सतत बोलण्याची संधी मागवून देखील संधी मला मिळाली नाही. सभेत महापौरांचा राजदंड पळविण्याची देखील सोय नाही. महापौरांच्या हौदासमोरील रचना बदलली आहे. त्यामुळे वैतागून मी महापौरांचा निषेध म्हणून सभागृहात पाण्याचा ग्लास फोडला.
राज्यातील सत्ता गेल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. महापौर ढोरे नव्हे तर आमदार लक्ष्मण जगताप सभागृह चालवितात. त्यांच्या रिमोट कंट्रोलवरच महापौरांकडून सभागृह चालविले जात आहे. महापौरांकडून दादागिरी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत मला सव्वालाख मते पडली म्हणून आमदार लक्ष्मण जगताप महापौरांच्या आडून माझ्यावर निशाणा साधत आहेत.
महापौर ढोरे या आमदार जगताप यांच्या रिमोट कंट्रोल आहेत. आमदार जगताप यांच्याकडून पाहिजे तसा रिमोटचा वापर केला जात आहे. मात्र. ही अरेरावी सहन केली जाणार नाही. त्यांना याचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल, असे राहुल कलाटे यांनी महासभा संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.















