न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेची फेब्रुवारीची तहकूब सभा आज (बुधवारी) पार पडली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. पिंपरी-चिंचवड शहरातील २००७ पूर्वीच्या जुन्या मालमत्तांच्या करात अडीच ते तीनपटीने वाढ होणार आहे. कर आकारणी झालेल्या जुन्या मिळकती व नवीन मिळकती यांच्या करामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. कर आकारणीत सुसूत्रता, पारदर्शकता येण्यासाठी इमारतीचा वापर आणि बांधकाम दर्जा विचारात घेऊन प्रति चौरस फुटानुसार करयोग्य मूल्य निश्चित करण्यात आले आहे.
महासभेने २० फेब्रुवारी रोजी निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, सभागृहाने निर्णय घेतला नाही. त्यामुळे करयोग्य मूल्य पद्धत लागू करण्यात येईल. ० ते २ वर्षाच्या इमारतीला ० टक्के घसारा, ३ ते ५ वर्षाच्या इमारतीला ५ टक्के, २१ ते ३० वर्षापर्यंतच्या इमारतीला ३० टक्क्यांपर्यंत घसारा लागू केला जाईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सभेत स्पष्ट केले आहे. ही करवाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नसून १ एप्रिलपासून करवाढ लागू होणार आहे. तसेच महासभेने २० फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला नसल्याने करवाढ लागू होणारच असेही त्यांनी स्पष्ट केले.
सभेत विरोधक व सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी या चर्चेत सहभाग घेतला. तसेच या निर्णयाला विरोधही केला. तसेच न्यायालयात जाण्याचा इशाराही यावेळी नगरसेवकांनी आयुक्तांना दिला. मात्र, २० फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा न झाल्याने आयुक्तांच्या अधिकारात हा निर्णय लागू झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांवर पुन्हा कराचे भूत नाचणार यात दुमत नाहीच..















