न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुरू असलेल्या गोंधळात स्वच्छ भारत अभियानअंतर्गत घरगुती शौचालयाच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. या विषयाला देण्यात आलेली, रोड स्वीपर मशिनने रस्ते सफाई कामांसाठी १०६ कोटी खर्चाची उपसूचना सत्ताधाऱ्यांनी मंजूर केली. अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना करवाढीच्या विषयावर बोलू न दिल्याने सभागृहात गोंधळ सुरू असताना महापौर ढोरे यांनी सभेचे कामकाज पुढे सुरू ठेवले.
या गोंधळात रोड स्वीपर मशिनने रस्ते सफाईच्या कामास उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली. रस्ते सफाईचे हे काम ८ वर्षे कालावधीसाठी आहे. त्यासाठी वर्षाला ९७ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. टंडन अर्बन सोल्युशन या सल्लागार एजन्सीच्या सूचनेवरून कामाचा कालावधी ७ वर्षांचा करण्यात आला आहे. त्यासाठी वर्षाला ९ कोटीने खर्च वाढवून तो १०६ कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे, या खर्चाला मंजूरी देण्याची उपसूचना सत्ताधाऱ्यांनी गांधळात मंजूर केली, त्यास विरोधकासह काही भाजपनगरसेवकांचा विरोध होता. मात्र, तो विषय उपसूचनेद्वारे मंजूर केल्याने भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हा विषय उपसूचनेद्वारे घुसवून त्याला मंजुरी दिल्याने भाजपचे शत्रुघ्न काटे व तुषार कामटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, स्वीपर मशिनने रस्ते सफाईच्या विरोधात स्वच्छता कामगारांनी काही दिवासांपूर्वीच आंदोलन केले होते.















