न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२०) :- महापालिका सभागृहात शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी महापौर उषा ढोरे यांच्या दिशेने काचेचा ग्लास फेकून मारला. त्या कृतीतून त्यांनी शहराच्या प्रथम नागरिकाचा आणि महिला वर्गाचा अपमान केला आहे. जोपर्यंत महापौरांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना सभागृहात प्रवेश देणार नाही, असा इशारा सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिला आहे.
महापौरांच्या दिशेने ग्लास फेकणे, हा एका महिलेचा अपमान आहे. कलाटे यांचा निषेध करीत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे केली. या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी पालिका भवनात घोषणाबाजी केली. या वेळी महापौर, उपमहापौर, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.
ढाके म्हणाले की, सभागृहात बोलू न दिल्याने महापौरांच्या दिशेने ग्लास फोडून निषेध करणे, ही चुकीची पद्धत आहे. हा शहराच्या प्रथम नागरिकांचा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. तसेच, त्यांनी महापौरांची माफी मागावी. त्यानंतरच त्यांना सभागृहात प्रवेश देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर ढोरे म्हणाल्या की, पूर्वीच्या विषयावर ते बोलले. त्यांनी हात वर केला नव्हता. त्यामुळे पुढील विषय पुकारला. त्यांनी थेट ग्लास फोडला. सभागृहाची शिस्त सर्वांनी पाळणे बंधनकारक आहे. या पुढे असा प्रकार घडल्यास कारवाई केली जाईल. आ. लक्ष्मण जगताप यांच्या आदेशावरून नाही तर, महापौर म्हणून मिळालेल्या अधिकारानुसार सभागृहाचे कामकाज चालविते, असे त्यांनी स्पष्ट केले.















