न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२०) :- जागतीक मराठी राजभाषा दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या वतीने पिंपरीत मराठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्याला चित्रपट प्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. पिंपरीतील विशाल ई स्क्वेअर सेनेमा गृहासमोर हा उपक्रम घेण्यात आला.
या स्वाक्षरी मोहीम उपक्रमाचे उद्घाटन मनसेचे शहराध्यक्ष तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे गटनेते सचिन चिखले यांच्या हस्ते झाले. मनसे चित्रपट सेनेच्या वतीने चित्रपट गृहासमोर बोर्ड लावण्या आला होता. त्यावर महाराष्ट्राचा नकाशा आणि त्यामध्ये पांढरा बोर्ड तयार केला होता. त्यावर शहराध्यक्ष चिखले यांनी स्वाक्षरी करून उपक्रमाला चालना दिली. यासह मनसेच्या विविध संघटनांच्या वतीने शहरात विविध ठिकाणी मराठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्याला नागरिकांचा उदंड प्रतिसादही मिळाला. मनसेचा हा उपक्रम शहरात अनोखा ठरला.
यावेळी विद्यार्थी सनेचे अध्यक्ष हेमंत डांगे, जनहित कक्ष शहराध्यक्ष राजू भालेराव, चित्रपट सेनेचे दत्ता घुले, प्रज्ञा पाटील, तुकाराम शिंदे, शिवा दिलपाक, स्वाती बालटे, प्रसाद खैरे, दीपक भालेराव, रमेश विरनक, प्रणव आसरे, रोहन पवार, वैजिनाथ ढोपरे, सुरज लोणारी आदी यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी मराठीत स्वाक्षरी करून मराठी राजभाषा दिवस साजरा केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. संबंध महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांमध्ये केवळ मराठी भाषेतून व्यवहार आणि कामकाज झाले पाहिजे, यासाठी मनसेचा टोकाचा आग्रह आहे. यातूनच मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. त्याला चित्रपट पहायला येणा-या शौकिनांचा उदंड प्रतिसाद मिळाला.












