न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२०) :- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर इ – चलनद्वारे ऑनलाइन चलन पाठवून कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई मान्य नसल्यास तक्रार अर्ज करता येतो. गेल्या वर्षभरात ३७२ वाहन चालकांनी अशा प्रकारचे अर्ज केले आहेत. यापैकी २३८ अर्जाची निर्गती करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात होती. यामध्ये वाहन चालकांचा वेळ वाया जात होता. तसेच अनेकदा वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये वाद होत होता. वाहतूक पोलीस मोठ्या प्रमाणात पैसे खातात, असाही आरोप होता होता. यामुळे वाहतूक पोलिसांनी रोख स्वरूपात दंड – स्वीकारायचा नाही, असा निर्णय शासनाने घेतला. तसेच कारवाई करताना ई – चलनद्वारे कारवाई करून त्याची माहिती संबंधित वाहन चालकाच्या मोबाइलवर पाठविण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली.
ई – चलनद्वारे केलेल्या कारवाईवर देखील अनेक चालकांचा आक्षेप येऊ लागला. आक्षेप असणारे वाहन चालक वाहतूक पोलिसांकडे अर्ज करीत होते. त्यानुसार गेल्या वर्षभरात ३७२ वाहन चालकांनी आक्षेप घेतला. त्या वाहन चालकांना बोलावून केलेली कारवाई कशी योग्य आहे, हे दाखवून दिले. अशा प्रकारे वाहतूक पोलिसांनी २३८ अर्जाची निर्गती केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी दिली.
ज्या नागरिकांना ई चलन मान्य नसल्यास त्यांनी ८४४८४४८९६० अथवा हेल्पलाइनवर तसेच helpdesk@mahatrafficechallan.gov. in या ई – मेल आयडीवर आपल्या तक्रारी नोंद कराव्यात, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. तसेच MahaTrafficapp या अॅपद्वारे नागरिक वाहनावर केलेल्या कारवाईची माहिती घेऊ शकतात.












