न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२०) :- मोशी येथे पिंपरी न्यायालयाची इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीसाठी महाराष्ट्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पात ११७ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड अॅव्होकेटस् बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड . दिनकर बारणे यांनी दिली.
मोरवाडी येथे सध्या असलेली इमारत न्यायालयीन कामकाजासाठी अपुरी पडत असल्याने कायमस्वरूपी इमारतीसाठी मोशी येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र येथील इमारतीसाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप , आमदार महेश लांडगे आणि आमदार अण्णा बनसोडे यांनी विशेष प्रयत्न केले. अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, या मागणीसाठी अॅडव्होकेटस् बार असोशिएशनचे एक शिष्टमंडळ अ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात गेले होते. या शिष्टमंडळात आमदार अण्णा बनसोडे, अॅड . दिनकर बारणे, अँड. अतिश लांडगे, अँड संजय दातीर पाटील, अँड. अतुल अडसरे आदी होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी अर्थसंकल्पात मोशीतील न्यायालयाच्या इमारतीसाठी ११७ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे या शिष्टमंडळास सांगितले. ही तरतूद वित्त विभागाच्या सचिवाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर विधी आणि न्याय विभागाकडूनही मंजूरी मिळाल्यानंतर झारतीच्या निविदा प्रसिद्ध केल्या जातील, अशीही माहिती अँड. दिनकर बारणे यांनी दिली.
मोशी येथील न्यायालयाची नवीन इमारत होण्यास तीन ते चार वर्षाचा कालावधी लागणार आहे. सध्या मोरवाडी येथील न्यालयालयाची इमारत अपुरी पडत असल्याने येथील न्यायालयचे कामकाज नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिअमजवळील महापालिकेच्या इमारतीत स्थलांतरित केले जाणार आहे. याबाबतची प्रक्रियाही लक्करच मार्गी लागेल, असा विश्वास अॅड. बारणे यांनी व्यक्त केला.


















