- पिंपरी मतदारसंघात होणार ‘परमवीर चक्र विजेता पार्क’
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२०) :- महापालिकेच्या स्थायी समिती सभेत २०२० – २१ या आर्थिक वर्षाच्या ६ हजार ६२८ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पात सुमारे सातशे कोटी रुपयांच्या उपसूचनांचा समावेश करण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीत घट – वाढ करून या उपसूचनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अर्थसंकल्प फुगीर झालेला नाही. संबंधित अर्थसंकल्पाला महापालिका सर्वसाधारण सभेची अंतिम मंजुरी घ्यावी लागणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी होते.
महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभेसमोर १७ तारखेला सादर करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात सदस्यांनी विविध विकासकामे सचविली. त्यांचा समावेश करून अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. अर्थसंकल्प मांडताना त्यामध्ये नवीन संकल्पनांचा समावेश केलेला नव्हता. जन्याच योजनांना नवीन लेबल चिटकवून मांडण्यात आले होते. दरम्यान , त्यामध्ये आता काही प्रमाणात सुधारणा करीत नव्याने काही उपसूचना देऊन नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. स्थायी समितीत उपसूचनांच्या अंतर्गत एकत्रितपणे सुमारे सातशे कोटी रुपयांची कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. अर्थ संकल्पामध्ये नव्याने काही कामांचा समावेश करावा, अशा आशयाचे पत्र आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांना दिले होते.
ठळक बाबी…
- राज्यातील गड – किल्ल्यांवर महापालिका शाळांतील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सहल आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष करण्यास उपसूचनेद्वारे मंजुरी देऊन एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- योगाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने चिंचवड येथे अद्ययावत योगा भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर, १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- भोसरी मतदारसंघात अद्ययावत विपश्यना केंद्राची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी १ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता घेतली आहे. तर, ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
- शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती होण्यासाठी चिल्ड्रन्स ट्रॅफिक पार्क करण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता घेतली आहे. तर, ३० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
- अर्थसंकल्पात विकासकामांचा समावेश करताना विधानसभानिहाय कामे हाती घेण्यात आली आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उद्यानात ‘ सेव्हन वंडर्स थीम पार्क गार्डन ‘ करण्यात येणार आहे. त्यासाठी ५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. तर, १ कोटी रुपयांची तरतूद केली.
- एमपीएससी आणि यूपीएससी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी चिंचवड , भोसरी आणि पिंपरी अशा तिन्ही मतदारसंघासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन अभ्यासिका आणि डिजिटिल ग्रंथालय उभारले जाणार आहे, त्यासाठी ३ कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद ठेवली आहे.
- पिंपरी मतदार संघातंर्गत नॅशनल वॉर मेमोरिअलच्या धर्तीवर परमवीर चक्र विजेता पार्क तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता आणि ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- पिंपळेगुरव येथे ७ डी थिएटर बांधण्यात येणार आहे. त्यासाठी २ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजरी देण्यात आली तर ६० लाख रूपयांची तरतूद केली आहे.


















