- सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांचा उपसुचनांबाबतचा खुलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२०) :- पार्टी मिटींग मध्ये ठरल्यानुसार महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महत्वाचा उपसूचना घेण्यात आल्या. महत्वाच्या आणि तातडीच्या उपसूचना घेण्यात काही गैर नाही, असे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले. सभांमध्ये उपसूचना न आणता विषयपत्रिकेवर विषय घेऊन कामकाज करण्याचे आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. या निर्णयाला बुधवार ( दि . २६ ) पालिका सभेत मूठमाती देऊन गोंधळात तब्बल १३ विषय मंजुर करीत ‘ अपारदर्शक पणे कारभार केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
त्यासंदर्भात विचारले असता ढाके बोलत होते. ढाके म्हणाले की, पालिका सभेत उपसूचना न घेण्याचे प्रदेशाध्यक्षांचे आदेश आहेत. मात्र, महत्वाच्या आणि तातडीच्या कामांसाठी उपसूचना देण्यास हरकत नाही. पार्टी मिटींगमध्ये झालेल्या चर्चेनुसा उपसूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, महापालिका सभेत मंजुर केलेल्या ५ ते ६ उपसूचना दुसऱ्या दिवशी गुरूवार ( दि . २७ ) पर्यंत आपल्यापर्यंत आल्या नसल्याचे नगर सचिव उल्हास जगताप यांनी सांगितले. तसेच, उपसूचना स्वीकारण्याचे सर्व अधिकार महापौरांना आहेत. तहकूब सभेत उपसूचना देण्याचा अधिकार सभागृहाला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सभागृहात उपसूचना घुसविण्याच्या प्रकारावरून वाद वाढण्याची शक्यता आहे.
विरोधकांचे झोपेचे सोंग…
रोड स्वीपरने रस्ते सफाईच्या कामास सत्ताधारी नगरसेवक विरोध करीत आहेत. पक्षाच्या कारभारावर आक्षेप घेत आहेत. तर, दुसरीकडे पालिकेतील विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपच्या कारभाराबाबत उपसूचनांच्या प्रकाराबाबत झोपेचे सोंग घेतले आहे. रोड स्वीपरसारख्या निविदेत विरोधकांचेही सोटेलोटे झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.















