न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२०) :- तत्कालीन लोकप्रितिनिधिंची भुमिका आणि दुर्दैवी धोरणामुळे खेडचे विमानतळ दुसरीकडे गेले. वास्तविक , चाकण एमआयडीसी आणि परिसरातील कंपन्यांचा विचार करता, या परिसरात निदान राष्ट्रीय ( डोमेस्टीक ) विमानतळ तरी होणे गरजेचे आहे, असे मत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
हडपसर विधानसभा मतदार संघातील विविध प्रलंबित कामांसंबंधी खा. डॉ. कोल्हे यांनी गुरुवारी पुणे महापालिकेत आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात डॉ . कोल्हे यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळासंदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचाल्यानंतर त्यावर उत्तर देताना डॉ. कोल्हे यांनी चाकणसाठी विमानतळ गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अजूनही चाकण – खेडला विमानतळ होऊ शकते, अशा अर्थाचे अप्रत्यक्ष, सूचक वक्तव्य केले होते.















