न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२०) :- सेक्टर २८ प्राधिकरण परिसरात भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या आवारातील ट्रान्सफॉर्मरच्या केबल्सला रविवार (दि. २३) रोजी सकाळी ११.०० वाजता शॉर्ट सर्किट मुळे मोठी आग लागली. त्या वेळेस तेथे उपास्थित असलेलले प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, पदाधिकारी विजय मुनोत व संतोष चव्हाण यांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशामक दलास याबाबत कळविले.
काही मिनिटातच अग्निशामक दलाचे जवान त्या ठिकाणी पोहचले व आगीवर नियंत्रण मिळवले. तेवढ्या वेळात ट्रान्सफॉर्मर च्या आजूबाजूस पार्क केलेल्या वाहनांना त्या ठिकाणाहून तातडीने हलविण्यात आले व परिसरातील रहिवाशी नागरिकांना या बाबत सूचित करण्यात आले. ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन जीवित हानी घडल्याची अनेक घटना आपल्या शहरात घडल्यामुळे इथेसुद्धा असा प्रसंग न घडण्यासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांना सावध केले व अग्निशामक दलास पाचारण केले.
सदरची आगीची मोठी दुर्घटना रोखण्यासाठी मदत केलेल्या समितीच्या कार्यकर्त्यांचा महापालिका अ प्रभाग कार्यालयामध्ये प्रभाग अध्यक्ष नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या हस्ते समितीचे अध्यक्ष विजय पाटील, संपर्कप्रमुख विजय मुनोत व विभाग प्रमुख संतोष चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, प्रकाश पावले उपस्थित होते.
या प्रसंगी शर्मिला बाबर म्हणाल्या, “आपल्या प्रभागात सतर्क कार्यकर्त्यांमुळे आगीची मोठी दुर्घटना टळली. वर्दळीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी समयसूचकता दाखवून ट्रान्सफॉर्मरच्या मुख्य भागास दुर्घटनाग्रस्त होण्यापासून रोखले. सदरचे कार्यकर्ते शहर परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे नागरिकांमध्ये सामाजिक जागरूकता वाढीस लागते. अश्या कार्यकर्त्यांचा सन्मान होणे उचितच आहे. सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन.”
समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, “शहरात ट्रान्सफॉर्मर सुरक्षा कवचांसह बसवणे आवश्यक आहे तसेच ट्रान्सफॉर्मर सुरक्षा नियमांचे पालन व अंमलबजावणी महावितरण विभागाने तंतोतंत पाळली पाहिजे व त्याचे सेफ्टी ऑडिट तृतीय पक्षाकडून वर्षातून दोन वेळेस होणे गरजेचे आहे. तरच ट्रान्सफॉर्मर चे अपघात टाळता येतील.”












