न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२०) :- महापालिकेच्या स्थायी समिती सभेत शुक्रवारी तब्बल १५९ विषयांना मंजुरी देण्यात आली. सुमारे ३०० ते ३५० कोटी रुपयांच्या विकासकामांचा त्यामध्ये समावेश आहे. स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी यांच्या कार्यकाळातील ही शेवटची सभा असल्याने रात्री उशिरापर्यंत काम करत महत्त्वाच्या विषयांना मार्गी लावण्यात आले.
शहरातील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्याच्या विषयाबाबत असलेला विरोध आणि त्याबाबत उद्भवलेला वाद लक्षात घेता हा विषय सभेत दाखल करून घेतला गेला नाही. तांत्रिक मुद्यांचे कारण देत आयुक्तांनी हा प्रस्ताव मांडलाच नाही.
सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. सायंकाळी साडेपाच वाजता स्थायी समिती सभा सुरू झाली, ती रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु होती. सभेसमोर २६ विषय मंजुरीसाठी होते. तर, आयत्या वेळी १३४ विषय दाखल करून घेतले. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर नूतनीकरणाच्या कामासाठी वाढीव ४५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. अन्य प्रस्ताव मात्र मंजूर केले.
शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याची वार्षिक ९७ कोटी रुपये खर्च गृहित धरुन काढलेली निविदा वार्षिक १०६ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. याबाबतच्या या वाढीव रकमेला सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे मंजरी देण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातला होता. मात्र, सर्वसाधारण सभा गोंधळात पार पडली. ही उपसूचना सभेत वाचलीच गेली नाही, असा आक्षेप भाजपच्या स्वपक्षीय नगरसेवकांनीच घेतला. तसेच, याबाबत सत्यता तपासल्याशिवाय कार्यवाही करू नका, अशी आग्रही मागणी संबंधितांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन केली. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव स्थायी समेत दाखल करून घेतला जाणार होता. मात्र, आयुक्तांनी या प्रस्तावाबाबत काही तांत्रिक अडचणी असल्याचे कारण दिले. त्यामुळे हा विषय सभेत दाखल करण्यात आला नाही. त्याशिवाय, खासगी वाटाघाटीचा प्रस्ताव देखील कामकाजात घेतला गेला नाही.












