न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२०) :- पवना नदीतील जलपर्णी काढावी तसेच फेरीवाल्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी चिंचवडगावात दोन ठिकाणी श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्यावतीने गुरुवारी (दि. २७) स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या अभियानास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
पवना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली असून संपूर्ण नदी हिरवीगार झाली आहे. यामुळे परिसरात मच्छरांचे प्रमाणही वाढले असून त्याचा थेट त्रास नागरिकांना होत आहे. तसेच चिंचवडगावातील फेरीवाल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून यामुळे नागरिकांना वाहन चालविणे तर सोडाच परंतु प चालणेही मुश्कील झाले आहे.
या दोन्ही समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्री काळभैरनाथ उत्सव समितीच्यावतीने गुरूवारी मोरया गोसावी मंदीराजवळील जिजाऊ पर्यटन केंद्र आणि चापेकर चौकात सकाळी दहा वाजल्यापासून स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या मोठ्या अभियानात चिंचवड परिसरातील सर्वच गणेशोत्सव मंडळांनी सक्रिय सहभाग घेतला. महापालिकेने या स्वाक्षरी अभियानाची दखल घेत थेट कारवाई केली नाही तर आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा उत्सव समितीच्यावतीने देण्यात आला आहे.















