न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२०) :- विनयभंग केल्याची खोटी तक्रार देणाऱ्या महिलेला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पिंपरी न्यायालयाने मायलेकास दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात प्रत्येकी ९ महिन्यांची सक्तमजुरी तसेच दंडाची शिक्षा पिंपरीचे न्यायाधीश डी. आर. एस पठाण यांनी सुनावली. स्वरूपा अनिलकुमार लोढा, दर्शन लोढा (दोघे रा. यमुनानगर, निगडी) अशी मायलेकांची नावे आहेत.
चिंचवडगावात २८ सप्टेंबर २०१३ ला एका दुकानासमोर पार्किंगवरून वाद झाला होता. त्या वेळी तक्रारदार संजय शेट्टी यांना स्वरूपा लोढा हिने शिवीगाळ करत विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती. याबाबत शेट्टी यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या गुन्ह्यात साक्ष दिल्याच्या कारणावरून स्वरूपाने एका महिलेला शिवीगाळ केली. याची सुनावणी पिंपरी न्यायालयात झाली.
सरकारी वकील साधना बोरकर यांनी साक्षीदार तपासले. साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने दोघांना शिक्षा सुनावली. तत्कालीन पोलिस अधिकारी सीमा सुर्वे यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी सी. एच. साबळे यांनी तपास केला.












