- मनसे व राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेबद्दल नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद – सचिन चिखले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील निगडी-प्राधिकरण परिसरातील सेक्टर. २४, २५, २६, २७, २७ अ, २८ या परिसरात शहर मनसेच्या वतीने ‘मनसे आपल्या दारी’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानांतर्गत मनसेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व मनसे गटनेता तथा शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व कार्यकर्ते व महत्वाच्या व्यक्तींच्या तसेच विविध सामाजिक संघटनांच्या भेटी घेऊन, त्यांना बदललेल्या मनसेच्या झेंड्याची व पक्षाच्या भूमिकेची माहिती सांगण्यात आली.
यावेळी ‘मनसे आपल्या दारी’ या पत्रकाचे रविवारी (दि. १ मार्च) रोजी मनसेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस किशोर शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी परिसरातील विनित हौसिंग सोसायटी, शुक्रतारा हौसिंग सोसायटी, चैतन्य हौसिंग सोसायटी व त्यांचे अध्यक्ष व सभासद यांना भेटून त्यांना ‘मनसे आपल्या दारी’ चे पत्रक देण्यात आले.
शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की , या भेटी-गाठी दरम्यान सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन घरातील सर्व माता-बहीणींची आदराने विचारपुस केली. तसेच प्रत्येक मंडळ व सामाजिक कार्यकर्ते यांचीही भेट घेतली. शहरातील प्रतिष्ठित नागरिक व विविध सामाजिक संघटनांची भेट घेऊन, त्यांना मनसेच्या कार्याची माहिती सांगितली. मनसैनिकांनी त्यांच्याशी संवाद साधला. पक्षाची बदललेली ध्येय-धोरण व पक्षाविषयीची माहितीही नागरिकांना यावेळी देण्यात आली. या दरम्यान नागरिकांनीही राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला,
या अभियानात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, मनविसे शहर अध्यक्ष हेमंत डांगे, महिला शहराध्याक्षा अश्विनी बांगर, उपाध्यक्ष विशाल मानकरी, विभाग अध्यक्ष मयुर चिंचवडे, दत्ता देवतरासे आदी उपस्थित होते. या अभियानाचे नियोजन ओंकार पाटोळे, उपविभाग अध्यक्ष दिपेन नाईक, प्रभाग अध्यक्ष प्रसाद मराठे, वाॅर्ड अध्यक्ष रोहित शिंदे व शाखा अध्यक्ष यांनी केले.
या अभियानांतर्गत भेटी-गाठी दरम्यान परिसरातील तीन ते चार हजार नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला, अशी माहिती मनसेचे पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष बाळा दानवले, निगडी प्राधिकरण महिला प्राधिकरण विचार मंचच्या स्वाती बाळा दानवले यांनी दिली.












