न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मार्च २०२०) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत अर्थात दहावीच्या वार्षिक परीक्षेला आजपासून (दि. ३) सुरुवात होत आहे. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरातील २८, ५३५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
शहरातील विविध भागातील ४६ परीक्षाकेंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षा कालावधीत गैरप्रकारांवर नियंत्रणासाठी महापालिका शिक्षण विभाग व शिक्षण मंडळाकडून भरारी पथके गठित केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पिंपरी – चिंचवड शहरात दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी ३६ परीक्षा केंद्रावर २२ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
यावर्षी मात्र विद्यार्थ्यांची संख्या सहा हजाराने वाढली आहे. यावर्षी महापालिका शाळेतील १ हजार ८३५ विद्यार्थी तर खासगी शाळेतील २६ हजार ७०० असे एकूण २८ हजार ५३५ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे परीक्षा केंद्राची संख्या दहाने वाढविण्यात आली आहे. यावर्षी ४६ केंद्रावर परीक्षा पार पडणार आहे.
आज भाषा विषयाच्या पेपरने दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. सकाळी ११ ते २ या वेळेत होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपले हॉलतिकीट सोबत घेऊन परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा अर्धा तास आगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून यावर्षीही २ भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. यासोबत शिक्षण मंडळाची भरारी पथकेही परीक्षा दरम्यान पाहणी करणार आहेत. परीक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिक्षेत्रात परीक्षा कालावधीत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत.












