न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदान येथे आयोजित पवनाथडी जत्रेस आज (दि. ४) सुरुवात होणार आहे. जत्रेत एकूण १ हजार २५० स्टॉल आहेत. जत्रेत पाच दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. महिला बचत गटांना स्टॉलचे प्रमाणपत्र महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते मंगळवारी (दि. ३) प्रदान करण्यात आले.
या वेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, नगरसेविका सविता खुळे, सीमा चौगुले, सुनीता तापकीर, आरती चोंधे, शारदा सोनवणे आणि अधिकारी उपस्थित होते.
जत्रेत एकूण १ हजार २५० स्टॉल आहेत. त्यात वस्तू व साहित्य विक्रीचे एकूण ७५० स्टॉल आहेत. तर, शाकाहारी खाद्यपदार्थाचे ३०० आणि मांसाहारी खाद्यपदार्थाचे २०० स्टॉल आहेत. पालिकेचेही स्वतंत्र स्टॉल जत्रेत उभारण्यात आले आहेत. जत्रेचे आज बुधवारी दुपारी चार वाजता उद्घाटन होणार आहे. जत्रा रविवारी(दि. ८) पर्यंत चालणार आहे. जत्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जत्रेला सहकुटुंब भेट देऊन महिला बचत गटांच्या उपक्रमास प्रतिसाद द्यावा आणि जत्रेचा आनंद लुटवा, असे आवाहन महापौर ढोरे यांनी केले आहे.















