न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरात लोकवस्ती झपाट्याने वाढल्याने वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. वेगाने वाहने चालविणाऱ्यांवर रोख बसावा, म्हणून महापालिकेने गतिरोधकांची उभारणी केलेली आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून या गतिरोधकांची दुर्दशा झालेली आहे. गतिरोधकावर असणारे पांढरे पट्टे पुसट झालेले आहेत.
या परिसरात पांढरे पट्टे व रिफ्लेक्टरच नसल्यामुळे रात्री-अपरात्री गतिरोधकांवर तोल जात अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे महापालिकेने तात्काळ गतिरोधकांची पाहणी करावी.
गतिरोधकावर असणारे पांढरे पट्टे पुन्हा रेखाटावेत. रिफ्लेक्टर तसेच ‘पुढे गतिरोधक आहे’ अशा आशयाचे फलक गतिरोधकाच्या काही फूट मागेच लावण्यात यावेत, अशी मागणी ‘ फ ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी ‘ फ ‘ प्रभागाच्या अध्यक्षा योगीता नागरगोजे तथा महापालिकेचे स्थापत्य व बीआरटी विभागाचे अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.












