- चिखली कृष्णानगरमध्ये मात्र, मेडिकल दुकानदाराचे आदर्शवत उदाहरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२०) :- शहरातील अत्यावश्यक सेवेतील बहुतांशी मेडिकल दुकानांवर ग्राहकांची गर्दी आढळून येत आहे. ग्राहक सुरक्षित अंतर न राखता हवे तसे दुकानांसमोर गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे करोनाचा फैलाव होण्यास वाव मिळत आहे. यात विशेष म्हणजे मेडिकल दुकानदारांना परिस्थितीचे गांभीर्य माहित असताना देखील, दुकानात औषधे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना याबाबतीत मार्गदर्शन करताना हे मेडिकल दुकानदार दिसून येत नाहीत. उलट हे दुकानदारही त्यांच्याशी सुरक्षित अंतर न ठेवता अनावश्यक गोष्टींवर चर्चा करताना आढळून आलेले आहेत. सर्व्हे दरम्यान शहरातील विशेषतः चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी परिसरातील मेडिकल दुकानांमध्ये वरील प्रकार निदर्शनास आलेला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एक उपाय आहे. मात्र याला जाणीवपूर्वक हे मेडिकल दुकानदार फाटा देताना दिसून येत आहे. याउलट शहरातील काही दुकानदारांनी मात्र जबादारपणाचे दर्शन घडवत चांगले उदाहरण घालून दिले आहे. आपल्याला हवा ती औषधे मिळतील, पण त्यासाठी शिस्त पाळा, गर्दी करू नका, असे आवाहन करीत ग्राहकांना आरोग्याचा कानमंत्र दिल्याचे पाहायला मिळाले.
चिखली कृष्णानगर येथील स्पाईन रोड कॉर्नर येथील श्रीयश मेडिकल स्टोअर हे त्याचे एक उत्तम उदाहरण होय. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत रांगेत ग्राहक औषधे घेत असल्याचे सुखद दृष्य या ठिकाणी पाहायला मिळाले. दोन ग्राहकांमध्ये एक मीटरपेक्षाही जास्त अंतर असलेली रांग या दुकानापुढे पाहायला मिळाली. ग्राहक देखील घाई गडबड न करता शांतपणे शिस्तीत औषधे घेत होते. शिस्तीमुळे प्रत्येकाचाच नंबर लवकर येत होता.













