- आशा स्वयंसेविकेसह आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार ५० लाखांचं आरोग्य विमा संरक्षण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२०) :- देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय योग्यच आहे. मात्र या कालावधीत हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.
देशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. आशा वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचंही सीतारामन यांनी जाहीर केलं. देशभरातील २० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
गरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ, १ किलो डाळ मोफत :-
पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे. अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली. एकही गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी आम्ही सराकर म्हणून घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. देशातील ८० कोटी लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अन्नदात्यासाठी महत्त्वाची तरतूद :-
अन्नदाता अर्थात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद करण्यात येणार आहे. ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. एप्रिल महिन्यात हे पैसे खात्यांवर जमा केले जातील असंही अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत हे पैसे जमा केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. शेतकरी, मनरेगा कर्मचारी, विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. असंही आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं.
आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाखांचं आरोग्य विमा संरक्षण :-
स्वास्थ्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी हे आज एखाद्या योध्याप्रमाणे देशाची सेवा करत आहेत. त्यांच्यासाठी प्रती व्यक्ती ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत २० लाख कर्मचाऱ्यांचा समावेश होईल. देशातील कामगार, गरीबांना आज मोठी मदतीची मोठी आवश्यकता आहे. ज्यांच हातावर पोट आहे. त्यांचे हाल होत आहेत, असंही त्या म्हणाल्या.दरम्यान, करोनाशी लढण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी प्रत्येकी ५० लाखांच्या आरोग्य विम्याची घोषणा यावेळी सीतारामन यांनी केली.
जनधन खातेधारक महिलांना प्रति महिना ५०० रुपये मिळणार. ही रक्कम पुढील तीन महिने मिळणार.
उज्जला योजनेतंर्गत दारिद्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या देशातील ८ कोटी महिलांना पुढील तीन महिने गॅस सिलिंडर मोफत केंद्र सरकार मोफत पुरवणार.













