न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ एप्रिल २०२०) :- डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्यात नुकत्याच झालेल्या सामंजस्य करारानुसार आत्ता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे केवळ कोरोना बाधित रुग्णांवर पूर्ण क्षमतेने उपचार करणार असून डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय नॉन कोविड रुग्णांवर उपचार करणार आहेत.
“मा आयुक्तांच्या निर्देशानुसार कोरोना बाधितांवर वाय सी एम रुग्णालय कार्यरत असून इतर रुग्णांच्या उपचारांबाबत निर्णय घेणे फार महत्त्वाचे होते. त्या अनुषंगाने डॉ.डी.वाय.पाटील विद्यपीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांनी इतर रुग्णांच्या उपचाराबाबत सकारात्मक सहमती देऊन डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय हे इतर आजारावरील रुग्णांवर उपचार करणार आहेत.” अशी माहिती डॉ राजेंद्र वाबळे (अधिष्ठाता, पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी) यांनी दिली.
“मा.आयुक्त श्रवण हर्डीकर व अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्याशी झालेल्या सामंजस्य करारानुसार नॉन कोविड रुग्णांची आम्ही काळजी घेण्यास सक्षम आहोत आम्हाला आशा आहे की कोविड व नॉन कोविड रुग्णांची वेगवेगळी व्यवस्था केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळता येईल” असे मत डॉ. जे. एस. भवाळकर (अधिष्ठाता,डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी) यांनी व्यक्त केले.
“कोरोना बाधितांवर शासकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेचे कार्यरत आहे त्या अनुषंगाने सध्याच्या घडीला इतर ही आजारी रुग्णांवर उपचार करणेही तितकेच गरजेचे आहे. रुग्णांचे आरोग्यहित पाहता त्यांना सर्वोतोपरी उपचार देण्यास आमचे रुग्णालय कटिबद्ध आहे.” असे मत डॉ. पी. डी. पाटील (कुलपती डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी पुणे ) यांनी व्यक्त केले.
झालेल्या कराराच्या आदान – प्रदान प्रसंगी डॉ. राजेंद्र वाबळे अधिष्ठाता वाय सी एम, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण, आदी उपस्थित होते.












