न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२०) :- सामाजिक चळवळीत नेहमीच योगदान असणाऱ्या उद्योजक डॉ. संतोष बारणे यांनी आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, पिंपरी-चिंचवड महापालिका संचलित यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील ब्लड बँकच्या सहयोगाने मोशीतील सिल्वर ९ सोसायटीमध्ये नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सुमारे १५०० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले.
भोसरी एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे, डॉ. संतोष बारणे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी शिवाजी बारणे, सचिन बारणे, राकेश गायकवाड, विजय आवटे, सतीश खरात, गणेश निकम, सागर बोगाडे, अजीज साजी तसेच डॉ. संतोष बारणे मित्र परिवाराचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
डॉ संतोष बारणे म्हणाले की, ‘राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे राज्यातील रक्तसाठा कमी झाला आहे. परिणामी, कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्तांची कमतरता जाणवू लागली आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत रक्तदान करावे. छोटी-छोटी रक्तदान शिबिरे आयोजित केली जावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने मोशीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच, यावेळी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचेही पालन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून मोठा रक्तसाठा उपलब्ध झाला आहे. त्याचा फायदा निश्चितीच शहरातील गरजू रुग्णांना होईल’.
दरम्यान रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना सॅनिटाईझरचे वाटप करण्यात आले. तसेच ब्लड बँकचे प्रमाणपत्रही रक्तदान शिबिरात सहभागी रक्तदात्या नागरिकांना देण्यात आले.


















