- पंतप्रधान सहायता निधीस मदत केल्याने राष्ट्रवादीच्या वाघेरेंची भाजपवर टीका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२०) :- ‘ करोना ‘ मुळे निर्माण झालेल्या अत्यंत वाईट परिस्थितीतही पिंपरी – चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून दुर्देवी राजकारण करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री निधीला मदत देण्याऐवजी पंतप्रधान मदत निधीला भाजपा नगरसेवकांनी एक महिन्याचे वेतन देत खुशमस्करीचे दर्शन घडविले. एका बाजूला पंतप्रधान मदतनिधीला वेतन देणारे नगरसेवक व पदाधिकारी दुसरीकडे मात्र राज्य शासनाने शहरातील गरिबांना मदत करावी, अशी मागणी करत नवा पायंडा पाडल्याचेही वाघेरे यांनी म्हटले आहे.
याबाबत वाघेरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे. अपक्ष आणि भाजपाचे मिळून एकूण ८५ नगरसेवक सत्ताधारी गटात आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर दोन दिवसांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजपासह एक अपक्ष नगरसेवकांनी एक महिन्याचे वेतन पंतप्रधान सहायता निधीला देण्याचा निर्णय जाहीर केला.
बिकट परिस्थितीतही भाजपाकडून पक्षीय आणि खुशमस्करीचा निर्णय जाहीर करत दुर्देवी राजकारण केले. सध्या राज्यात तसेच देशात करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अक्षरशः आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. राज्य सरकारने आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार दानशूर व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, विविध आस्थापनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले एक महिन्याचे वेतन करोनाच्या संकटाशी लढण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला दिले. करोनाच्या संकटाशी सध्या सुरू असलेल्या या लढ्यात माणुसकीची अपेक्षा भाजपा नगरसेवकाकडून असताना त्यांनी दुर्देवी राजकारणाचे दर्शन शहरवासियांसमोर सादर केल्याचेही वाघेरे यांनी म्हटले आहे.













