न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल २०२०) :- शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली असून शनिवारी पुण्यात आणखी ९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यामुळे पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८३ झाली आहे. तर, पिंपरीमध्ये एकाच दिवशी नवीन सहाजण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे.
दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर मागील तीन दिवसांपासून पुन्हा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमात मर्कजमधील धार्मिक कार्यक्रमांतून आलेल्या दोघांना गुरुवारी आणि त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील एकाला शुक्रवारी अशा तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तबलिगी मर्कजमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी – चिंचवड शहरात आलेल्या २३ नागरिकांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये आलेल्या चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
याशिवाय डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल असलेला एक आणि पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेला पण पिंपरी – चिंचवडचा रहिवाशी असलेला अशा दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील एकजण अमेरिकेतून प्रवास करून आला आहे. एकाच दिवशी सहा रुग्ण आढळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शहरातील रुग्ण संख्या नऊवर गेली आहे.













