न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ एप्रिल २०२०) :- जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्र यामध्ये अव्वल स्थानावर आहे. सद्यस्थितीस महाराष्ट्रात ६९० जणांना करोनाची बाधा झालेली आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातही करोनानं हातपाय पसरण्यास सुरु केलं आहे. शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.
मुंबई २९, पुणे १७, पिंपरी-चिंचवड ४, अहमदनगर ३, औरंगाबाद २ असे ५५ नवे करोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण राज्यभरात आढळले आहेत. आजच्या तारखेपर्यंत ५६ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलेले आहे, असेही टोपे यांनी सांगितले आहे.
तर, कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर आपण लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.













