- मुंबईतील ३० वर्षीय गरोदर महिलेचा करोनाने मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या ८६८ झाली असून ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात एकूण १२० रुग्ण सापडले असून सात मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईमधील चार, वसई, नवी मुंबई आणि अंबरनाथमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत ५६ जणांवर उपचार करुन त्यांना घरी पाठण्यात आलेलं आहे.
तर, भारतात गेल्या २४ तासात करोनाचे ३५४ रुग्ण सापडले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत करोनाबाधितांची संख्या ४४२१ वर पोहोचली आहे. यामधील ३२५ जणांवर उपचार करण्यात आले आहेत. मृतांची संख्या ११४ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान करोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. नालासोपारा येथील रहिवासी असणाऱ्या या ३० वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर तिला मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महिला नऊ महिन्यांची गरोदर होती. ४ एप्रिल रोजी संध्याकाळी महिलेचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच मृत्यू असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे.













