- मजुरांना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी जयंत शिंदे यांचे घरातूनच उपोषण
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- कोरोनाला रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लाखो बांधकाम मजूर उपाशी पोटी झोपत आहेत. समाजातील या वंचित घटकाचे पोट भरण्यासाठी कामगार मंत्र्यापासून ते कामगार आयुक्तांपर्यंत सर्वांशी पत्रव्यवहार करूनही कोणतीच दखल घेतली जात नाही. घोषणांच्या पलीकडे काहीही होत नाही. त्यामुळे बांधकाम मजुरांसाठी काम करणाऱ्या बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जंयत शिंदे यांनी घरातच उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम मजुरांबाबत राज्य शासनाचे डोळे उघडणारच नसतील, तर संचारबंदीचे पूर्णपणे पालन करून या आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन दिले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व दैनंदिन जीवन ठप्प झालेले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम प्रकल्प, गृहप्रकल्पांचे बांधकाम, घर बांधणी सर्व बंद आहेत. बांधकामाच्या व्यवसायामध्ये हातावर पोट असणाऱ्या बांधकाम मजुरांची संख्या लाखोंच्या घरात आहे. दररोज कष्टाचे काम केले तरच या बांधकाम मंजुरांच्या घरातील चूल पेटते. आता कामच उरले नसल्याने बांधकाम मजूर उपाशीपोटी झोपत आहेत. या मजुरांच्या कुटुंबियांसमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.
लॉकडाऊन जाहीर होताच बांधकाम मंजुरांचे हाल होणार याची जाणीव झाली होती. त्यामुळे बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे दोन वेळचे पोट भरावे यासाठी बांधकाम कामगार सेनेने कामगार मंत्री, कामगार मंत्रालयाचे सचिव तसेच कामगार आयुक्त यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार केला. मात्र शासन स्तरावर या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकार सर्वांच्या मदतीसाठी अनेक घोषणा करत आहे. प्रत्यक्षात बांधकाम मजुरांच्या उपासमारीमुळे शासनाच्या या घोषणा केवळ कागदोपत्री असल्याचे सिद्ध होत आहे.
बांधकाम कामगारांना दिवसांतून एकवेळ जेवण देण्यासाठी सुरू असेली मध्यान्ह भोजन योजनाही राज्य सरकारने बंद केली आहे. बांधकाम मजुरांच्या उपासमारीची कोणतीच दखल घेतली जात नसल्यामुळे शासनाचा निषेध म्हणून बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांनी आपल्याच घरात मंगळवारपासून (दि. ७) उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणामुळे तरी शासनाचे डोळे उघडतील आणि बांधकाम मजुरांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय होईल, अशी त्यांना अपेक्षा आहे. परंतु, शासनाचे डोळे उघडलेच नाहीत, तर संचारबंदीचे पूर्ण पालन करून आंदोलनाची टप्प्याटप्प्याने व्याप्ती वाढविण्याचा इशारा जयंत शिंदे यांनी दिला आहे.












