न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव, खराळवाडी आणि घरकुल परिसरात करोनाचे रुग्ण सापडल्यामुळे धोका वाढला आहे. निजामुद्दीनवरून आलेल्या नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे दिसून आले. हे रुग्ण थेरगाव, खराळवाडी आणि चिखली स्पाईन रस्त्यावरील घरकुल भागातील असल्याने हा संपूर्ण परिसर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने सील केला आहे.
जर या परिसरातील करोनाचे रुग्ण इतरांच्या संपर्कात आले असतील तर करोनाच्या रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्येकाने घरात बसून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे. जर रुग्णांची संख्या वाढली तर त्यांच्यावर उपचारासाठी महापालिकेची रुग्णालये कमी पडू शकतात. यामुळे घरकुल येथील मोकळ्या इमारतीची पाहणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली. आता मात्र हेच नागरिक परिसर सील केल्याने आपल्या घरातच अडकून पडले आहेत. बाहेर सोडले जात नाही आणि बाहेरच्यांना आत प्रवेश दिला जात नाही. त्या ठिकाणी बाहेरचे नागरिक वाहनचालक येऊ नये म्हणून वस्तीमध्ये प्रवेश करणारे मुख्य रस्ते बांबू लावून बंद करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून ही खरबदारी घेण्यात आली आहे. शहरातील अनेक वस्त्यांमध्ये रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने मुख्य रस्ते बांबू, वाहने व बाके लावून बंद केले आहेत. त्या भागांत बाहेरील नागरिकांना ये – जा करण्यास अटकाव करण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या भागात तातडीने औषध फवारणी केली जाते. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा इतरांशी संपर्क होऊ नये म्हणून घरापासून १०० मीटरचा परिसर सील केला जातो. कोणालाच घरातून बाहेर पडू दिले जात नाही. नागरिकांवर देखरेख ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्तासह पालिकेचे पथक त्या – त्या भागात नियुक्त केले आहे, असे पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी सांगितले.












