विलगीकरणातील संख्या १९४०; आज नव्याने दाखल ५६ रुग्णांचे घशातील द्रव्य एनआयव्हीकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १७ असून शहरामध्ये आजपर्यंत एकुण २९ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. या पैकी १२ रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. उर्वरित १७ रुग्ण महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात व काही रुग्ण पुण्यात दाखल असून, रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यांचेवर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.
एकूण २९ रुग्णांपैकी १ कोविड बाधित रुग्ण खडकी कॅन्टॉनमेंटमध्ये रहाणारा आहे व २ रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील असुन ते सद्यस्थितीला पुणे येथील रुग्णालयात दाखल आहे. यात पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्याला असलेल्या आणि पुण्यातील एका नामांकित खासगी रुग्णालयात नोकरीला असलेल्या नर्सचा देखील समावेश आहे. या नर्सचे कोरोना रिपोर्ट आज (शनिवारी) पॉझिटीव्ह आले आहेत.
तसेच पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची आजपर्यतची संख्या १९४० असून त्या सर्वांनी किमान १४ दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील २८ दिवसापर्यत घरातच सूचनांचे पालन करावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आज दि. ११ / ०४/ २०२० पर्यंत एकुण ७५७ व्यक्तींचे कोरोना ( कोविड १९) घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. पैकी आज अखेर ७०३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तसेच आज दि. ११ / ०४ / २०२० रोजी एकुण ५६ व्यक्तींना यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले असून त्यांचे कोरोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्याचे नमुने एनआयव्ही. पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.















