- काळेवाडी-पिंपरी पूल देखील सार्वजनिक वाहतुकीसाठी राहणार बंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२०) :- कोरोनाविषाणूजन्य परिस्थितीत शहरातील काही भाग सील करण्यात आले असून, शहरातंर्गत विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बदल केला आहे. त्यात भोसरी, थेरगाव, रहाटणी, दिघी गावठाण यातील काही भागात वाहतूक पोलिसांनी सार्वजनिक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
तेथे केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. भोसरी अंतर्गत पीएमटी चौकाजवळील पूजा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स, भोसरी लिंक रस्ता, मेघना सोनोग्राफी, लांडेवाडी ते पिंपरी चिंचवड महापालिका कर संकलन कार्यालय, भगवान गव्हाणे चौक, आई तुळजा भवानी मंदिर ते मारुती मंदिर हा परिसर वाहतुकीसाठी बंद केला आहे.
तसेच, थेरगाव अंतर्गत क्रांतीवीर नगर, रहाटणी लिंक रस्ता, स्वस्तिक डायमंड अपार्टमेंट, आस्था मेडिकल, हॉटेल सिल्व्हर ९ च्या दिशेने जाणारा रस्ता त्याचप्रमाणे डांगे चौक आदित्य बिर्ला रुग्णालय ते तापकीर चौक ते काळेवाडी फाटा ते डांगे चौक हा रस्ता अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहणार आहे. त्याशिवाय दिघी गावठाण येथील स्कायलाईन सोसायटी, हॉटेल द्वारकाधीश, ओम सुपर मार्केट, फेज ३ रस्ता, ओम साई नर्सरी, साई हॉस्पीटल हा भाग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
तसेच कोरोना संसर्गाचा प्रसार थांबविण्यासाठी काळेवाडी-पिंपरी हा दोन गावांना जोडणारा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने आणि वैद्यकीय वाहनांना त्यातून वगळण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. संसर्ग रोखण्यासाठी शहराती सहा ते सात भाग सील करण्यात आले आहेत. वाकड परिसरातील थेरगाव, सुंदर कॉलनी, गणराज कॉलनी, क्रांतीवीर नगर या भागात पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्ण बंद केली आहे. तरीही वाहतूक होत असल्याने पूल बंद करण्यात आला आहे.


















