- सोमवारपासून शहरातील नाल्यांच्या सफाईला सुरुवात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ एप्रिल २०२०) :- अवकाळी पावसाची शक्यता विचारात घेता पिंपरी चिंचवड शहरातील नाल्यांची आणि स्टॉर्म वॉटर चेंबर, ड्रेनेज लाईनची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार आरोग्य विभागाच्या वतीने नाले सफाईचे काम सोमवार (दि. १३) पासून सुरू केले आहे.
शहरातील नाल्याचे काँक्रिटीकरण झाले असून नाल्यांमध्ये ठिकठिकाणी कचरा साठला आहे. झाडांच्या फांद्या, तसेच गवत वाढले आहे. चेंबरवर झाकण नसणे. काही ठिकाणी टाकलेला माती व राडारोडाचा भराव आहे. यामुळे येत्या पावसाळ्यात पावसाच्या पाण्याला अडथळा होऊन रस्त्यावर तळे निर्माण होण्याची शक्यता आहे. स्टॉर्म वॉटर लाईनच्या चेंबर तसेच, नाल्यामध्ये माती व कचरा पडल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरचे पाणी वाहन जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून घाणीचे साम्राज्य निर्माण होते. काही घरात पाणी शिरून नुकसान होते. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न होतो. हे रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी सर्व नाले स्वच्छ करून घेतले जातात. त्याच्या कामाची सुरुवात सोमवारपासून करण्यात आली आहे.
पावसाळ्यापूर्वी नाले, स्टॉर्म वॉटर लाईन व ड्रेनेज लाईन स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. अवकाळी पावसापूर्वी हे काम होणे आवश्यक आहे. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना त्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांनी आरोग्य विभागास त्यासंदर्भात आदेश दिले असून, भोसरी परिसरात काम सुरू झाले आहे. हे काम पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी करणार आहे. गरज भासल्यास जेसीबीचा वापर केला जाणार आहे, असे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सोमवारी सांगितले.


















