- नगरसेवक प्रवीण भालेकर यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२०) :- देशात व राज्यात कोरोना महामारीमुळे पुन्हा एकदा दि. ३ मे २०२० पर्यंत लाॅकडाउन घोषीत करून संचार बंदी कायदा लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वसामान्य व्यक्तीला घराबाहेर निघण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरात गोरगरिबांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत महापालिकेने शहरातील रेशन कार्ड नसलेल्या गरीब, मजदूर व गरजू लोकांना अन्नधान्याचे मोफत वाटप व्हावे, यासाठी प्रत्येक प्रभागातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याद्वारे गरजू व परराज्यातील कामगारांच्या कुटुंबांची माहिती संकलित करून त्याद्वारे त्यांना मोफत अन्नधान्याचे कीट द्यावे, अशी मागणी नगरसेवक प्रवीण भालेकर यांनी महापालिका आयुक्त, महापौर आणि तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये दररोज काम करून पोट भरणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. औद्योगीक नगरीमध्ये परराज्यातील अनेक कंत्राटी कामगारही अडकलेले आहेत. अशा कुटुंबाकडे रेशनिग कार्ड नसल्यामुळे त्यांना शासनाकडून रेशनही मिळत नाही. अशा परिस्थितीत ही कुटुंबे उपाशी राहू नये याची दक्षता घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा उपासमारीमुळे ही लोकं रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यासाठी प्रशासनामार्फत या गरजू लोकांना रेशनिंग वस्तूचे वाटप होणे गरजेचे आहे.
त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक प्रभागातील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या समन्वयातून प्रत्येक प्रभागातील गरजू व परराज्यातील कामगारांच्या कुटुंबांची माहिती संकलित करून, अशा गोरगरीब व गरजू लोकांपर्यंतअन्नधान्य पोचविल्यास शहरातील एकही नागरीक उपाशी राहून त्याच्यावर उपसमारीची वेळ येणार नाही. याची तातडीने दक्षता घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी ज्यांच्या कडे रेशनकार्ड नाही अश्या गरजू लोकांना प्रशासनामार्फत तात्काळ रेशनिग किटचे वाटप करण्यात यावे, असे या निवेदनात म्हटले आहे.