न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ एप्रिल २०२०) :- करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं केंद्र सरकारनं लॉकडाउनच्या कालावधीत वाढ केली. ३ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याबरोबरच देशातील करोनाचा उद्रेक झालेल्या ठिकाणी (हॉटस्पॉट) जास्त लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बुधवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
देशात करोनाचे १७० हॉटस्पॉट असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या हॉटस्पॉटच्या यादीत महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासह ११ जिल्ह्यांचा समावेश आहे.
देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्णांची महाराष्ट्रात आहे. तर राज्यातील एकूण रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आहेत. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. तर त्या पाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. मात्र, मुंबई पुण्याबरोबरच केंद्र सरकारनं राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई उपनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत करण्यात आलेला आहे.


















