न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि ७ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील १५० ते २०० कोरोना संशयित रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने दररोज तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविले जातात. त्याचा अहवाल मिळण्यास सुमारे १२ ते १८ तासांचा कालावधी लागतो.
हा विलंब टाळण्यासाठी महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रुग्णालयातच कोरोनाची चाचणी करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे.
येत्या आठवड्याभरात चाचणीचे अद्ययावत मशिन व यंत्रसामुग्री पालिकेस प्राप्त होणार आहे. त्यानंतर दररोज ४० ते ५० कोरोना चाचण्या घेता येणार आहेत. वायसीएम आणि नारी संस्थेत मिळून दररोज ८० ते १०० चाचण्या घेता येणार आहेत. त्यामुळे एनआयव्हीवरील बऱ्यापैकी ताण कमी होणार आहे. तसेच, अहवाल लवकर मिळून पुढील उपाययोजना व कार्यवाही करणे पालिका प्रशासनाला सुलभ होणार आहे. दरम्यान, पालिकेने वायसीएम रूग्णालयात कोरोनासाठी सुमारे २५० खाटांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी दिली.


















