न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात दाखल तब्बल ३४ रुग्णांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच महापालिका रुग्णालयात दाखल एकूण रुग्णांची संख्या १६९ झाली असून, यात रविवारी भोसरी व खराळवाडीतील पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन रुग्णांचाही समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांची १० दिवस उपचार झाल्यानंतर चाचणी न घेता घरी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानुसार मोशी, रुपीनगर व पिंपरीतील तपोवन परिसरातील ३० व पुण्यातील चार रुग्णांना रविवारी घरी सोडले आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील १०७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या सक्रिय ५० जणांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच भोसरीतील एक कोरोना व्यक्ती पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत होता, उपचारादरम्यान त्या रुग्णाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील एकूण मृत रुग्णांची संख्या चारवर गेली आहे. तसेच भोसरीतील हुतात्मा चौक परिसर रविवारी सील करण्यात आला आहे.


















