न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- पोलीस हवालदार कामठे हे बोपखेल फाटा चेक नाक्यावर रविवारी कार्यरत होते. रस्त्याने जाणाऱ्या सर्व वाहनांची पोलिसांकडून तपासणी केली जात होती. आरोपी त्याच्या कारमधून जात असताना कामठे यांनी आरोपीची कार चेक पोस्टवर थांबवली. कार थांबवल्याचा राग आल्याने आरोपीने पोलीस कर्मचारी कामठे यांच्या कानशिलात लगावली. भांडण केले.
पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांना दगड फेकून मारला. धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. आरोपीला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपीने वाहनाच्या खिडकीच्या काचेवर डोक्याने धडक मारून काच फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.
ही घटना रविवारी (दि. १०) संध्याकाळी सव्वापाच वाजता बोपखेल फाटा, गणेशनगर येथे घडली. महेंद्र रवींद्र वाघमारे (वय ४५, रा. रामनगर, बोपखेल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संजय व्यंकटेश कामठे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.


















