- घरी पोहोचताच तनिष्क आयकॉन सोसायटीतील नागरिकांचा पुष्पवर्षाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मे. २०२०) :- सर्वसामान्य नागरिकानंतर पोलीस कर्मचाऱ्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात महिला पोलिसांचा देखील समावेश आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील (सीआयडी) गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत महिला पोलीस कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. दोन्ही वेळची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना नुकताच डिश्चार्ज देण्यात आला.
या महिला पोलीस कर्मचारी पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरातील तनिष्क आयकॉन सोसायटीत राहतात. आपल्या घरी पोहोचताच सोसायटीतील नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून, त्यांचे ओवाळून व पुष्पवृष्टी करून, स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, शिवसेना विभाग प्रमुख संतोष वाळके, तनिष्क आयकॉनचे सर्व सभासद उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची एका पोलीस ठाण्याअंतर्गत ड्युटी लावण्यात आली होती. त्यांना खोकल्याचा प्रचंड त्रास होत होता. तरीही त्या ड्युटीवर येत होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.


















