न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२०) :- प्रभाग दोनमधील सिटी प्राईड, विष्णू विहार, विष्णू ग्रीन या रोडलगत असलेल्या सोसायट्यांमध्ये चेंबर व रस्त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कामांमुळे मागील वर्षी पावसाचे पाणी तुंबल्याने मोठे नुकसान झाले होते. नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. याकरिता पाऊस सुरू होण्याआधी संबंधित विभागाला आपण स्वतः लक्ष घालून कामे मार्गी लावावीत, असे निवेदन नगरसेविका अश्विनी जाधव यांनी आयुक्त श्रवण हर्डीकर यांना दिले.
जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, माझ्या प्रभागातील सिटी प्राईड, विष्णू विहार, विष्णू ग्रीन या सोसायट्यांमधील नागरिकांना मागील वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला होता. सोसायट्यांमधील रस्त्यांचे डांबरीकरण होणे आवश्यक आहे. तसेच चेंबर लाइनदेखील दुरुस्त होणे गरजेचे आहे. अन्यथा मागील वर्षीसारखी अवस्था या वर्षीदेखील होऊ शकते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित कामे हाती घ्यावीत.
गेल्या वर्षी सोसायट्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. तुंबलेल्या पाण्यामुळे दुगंधी, डासांचा त्रास तसेच दुर्गंधीयुक्त पाणी अनेकांच्या अंगावर उडाल्याचा प्रकारही अनेकवेळा झाला आहे. एवढेच नव्हे तर सिटी प्राईड शाळेत व इतर सोसायट्यांमध्ये पाणी घुसले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच आयुक्तांना निवेदन देऊन कामांना गती द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.













