न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२०) :- रेशनकार्डाशिवाय रेशन न दिल्याने स्वस्त धान्य दुकानातील कामगाराला एकाने दगडाने मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. ११) सायंकाळी संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.
सचिन विठ्ठल शिवलकर (वय ३६, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. १२) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रवीण दिलीप कांबळे (वय २६, रा. अजंठानगर, चिंचवड, मूळ रा. प्रतापसिंहनगर, सातारा) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी सचिन हे संभाजीनगर येथील धनंजय उबाळे यांच्या स्वस्त धान्य दुकानात कामाला आहेत. सोमवारी सायंकाळी रेशन दुकानदाराचा मुलगा आणि फिर्यादी रेशन वाटपाचे काम करत होते. त्यावेळी आरोपी प्रवीण दुकानात आला. त्याच्याकडे रेशन कार्ड नव्हते. त्यामुळे फिर्यादी सचिन यांनी त्यास धान्य दिले नाही. या कारणावरून प्रवीण याने सचिन यांना दगडाने मारले. यात सचिन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.












