न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२०) :- गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेले उद्योग व्यवसाय येत्या दोन दिवसात सुरू होणार आहेत. कंपन्यांमध्ये ३३ टक्के उपस्थिती ठेवून उद्योग दोन दिवसांत सुरू करता येतील, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नियमावली तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शासनाला प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत कार्यवाही केली. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज परवानगी दिली आहे. या बाबतचा आदेश महापालिकेला पाठविला आहे. ३३ टक्के उपस्थिती ठेवून काही अटींवर ही परवानगी दिली आहे. तसेच शहरात राहणाऱ्या कामगारांना त्यांच्या स्वतंत्र वाहतूक व्यवस्थेचा बंदोबस्त करूनच उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.


















