- आज पुण्यातील दोघांना कोरोनाची बाधा तर, दोघांचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२०) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत एका ३४ वर्षीय पोलिसाचा आज शुक्रवारी (दि. १५) रोजी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची लागण झालेला हा पोलीस पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पहिला पोलीस आहे. त्यामुळे शहर पोलीस दलाची चिंता वाढली आहे. हा पोलीस कर्मचारी विकासनगर, किवळे येथे वास्तव्यास आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे सदरचा परिसर देहूरोड पोलिसांनी सील केला होता. पोलीस कर्मचाऱ्याला व त्याच्या कुटुंबाला देखील क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान, खबरदारी म्हणून शहर पोलीस दलातील पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संबंधित पोलीस कर्मचारी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या निगडी येथील पोलीस मुख्यालयात टपाल कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सदरच्या कर्मचा-याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्याकडून टपाल घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला देखील तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तसेच नियंत्रण कक्षात व आयुक्तालयात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १८४ वर पोहोचला असून, महापालिकेच्या रुग्णालयात ५८ रुग्ण उपचार घेत आहेत.
शिवाय पुण्यातील ३९ वर्षीय पुरुषाला व ६० वर्षीय महिलेला देखील कोरोनाची लागण झाली आहे. हे दोघेही घोरपडी पेठ, व कामगार नगर, येरवडा येथील रहिवासी आहेत.
तसेच आज पुण्यातील दोन कोवीड – १९ बाधित रुग्ण मयत झाले आहेत. हे रुग्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दिबाहेरील पुण्यातील घोरपडी पेठ व कामगार नगर, येरवडा येथील रहिवासी आहेत. त्यांचेवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय येथे उपचार चालू असताना त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.


















