न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालय हे पूर्णपणे कोरोना रुग्णालय करण्यात आले आहे. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सलग ७ दिवस काम केल्यानंतर सलग ७ दिवस पगारी रजा देण्यात येत आहे. त्यानंतर पुढील ७ दिवस नॉन कोरोना कामकाज देण्यात येते. यामुळे कोरोना कक्षातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वायसीएम रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर ताण व दबाव वाढत आहे. या रूग्णालयात काम करणारे डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना काही काळासाठी या वातावरणापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे वरील कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना २१ दिवसांची ड्यूटी चक्राकार पद्धतीने लावण्यात येत आहे.
ट्रायल एरिया, आयसोलेशन आयसीयू, एनआयसीयू, कोरोना पॉझिटिव्ह वॉर्डमध्ये तसेच, पीपीई किट घालून रुग्णांशी थेट संपर्कात येणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ७ दिवसांनंतर सात दिवस पगारी रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याप्रमाणे नियोजन करावे, असे निर्देश वायसीएम पदव्युत्तर संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिले आहेत.














