न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे. २०२०) :- डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून कुख्यात गुंड महाकालीचा भाऊ मनोज उर्फ डिंगऱ्या ठकोलिया याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. १७) रात्री पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली घडली. मनोज उर्फ डिंगऱ्या फुलचंद दकोलिया (वय ३५, रा. रमाबाई नगर, रावेत,) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे.
याप्रकरणी आदम उर्फ गोट्या महमद खान (वय ३२ वर्षे रा. स्मशान भूमीजवळ, पूनावळे) या संशयिताला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंगऱ्या आणि आदम हे दारू पिण्यासाठी पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली बसले होते. दारू पित असताना त्यांच्यात भांडण झाले. यावेळी आदम याने लाकडी दांडक्याने डिंगऱ्याला डोक्यात मारहाण केली. त्यानंतर आदम घटनास्थळावरून पळून गेला. या बाबतची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डिंगऱ्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. कुख्यात गुंड महाकाली याचा एन्काऊंटर झाल्यानंतर काही दिवस त्याचा भाऊ डिंगऱ्या याने गॅग चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्याला यश आले नाही. डिंगऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असून त्याला तडीपार करण्यात आले होते. मात्र तडीपारीच्या आदेशाचा भंग करून तो पिंपरी चिंचवड शहरात आला होता.















